आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > दिन-विशेष

श्री गणेश चतुर्थी

श्री गणेश चतुर्थी             एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.

          पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे. या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात.

           भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया" या जय घोषाने संपूर्ण जन-सागर गणपती बाप्पाच्या आगमनात बुडून जातो.
     
           श्री गणेशाला अनेक नावाने संबोधले जाते.

मंगलमूर्ती : मंगलमूर्तीची उपासना केल्यावर आपण मंगल होतो. मंगल म्हणजे पवित्र. पवित्र म्हणजे ज्याच्यात कोणतेच विकार नाहीत, असा. तेव्हा आपण आपल्यातील दोष आणि अहं दूर करूया. आपण पवित्र होऊन आनंदी होऊया आणि यासाठी श्री गणपतीला प्रार्थना करूया, ‘हे गणराया, माझ्यातील दोष आणि अहं दूर करण्याची शक्ती आणि बुद्धी दे अन् मला तुझ्यासारखे मंगल कर.’

विनायक : श्री गणपति हा सर्वांचा नायक, म्हणजे नेता आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात ‘नेतृत्व’ हा गुण महत्त्वाचा आहे. आपण श्री गणपतीची कृपा संपादन करून हा गुण आत्मसात करूया. विघ्नहर्ता : आपल्या अभ्यासातील सर्व अडथळे श्री गणपति दूर करतो. आपण जर श्री गणपतीला तळमळीने प्रार्थना केली, तर श्री गणपति आपले सर्व अडथळे दूर करतो; कारण तो विघ्ने दूर करणाराच आहे.

वक्रतुंड : जे विद्यार्थी अभ्यास करतांना वाईट मार्गाचा अवलंब करतात, उदा. नक्कल करणे (कॉपी करणे), तसेच इतरांना त्रास होईल असे वागणे-बोलणे अशा वक्र, म्हणजे वाईट मार्गाने जाणार्‍यांना श्री गणपति योग्य मार्गावर आणतो.

बुद्धीदाता : श्री गणपति आपल्याला सात्त्विक बुद्धी देतो आणि ती आपल्याला सतत चांगला विचार करायला शिकवते. चांगला विचार हा आपल्याला आनंद देतो; म्हणून आपण श्री गणपतीला प्रार्थना करूया, ‘हे गणराया, मला सद्बुद्धी दे.’